रात्रीचे तीन-सव्वा तीन वाजलेले.
स्टडी ग्रुपचे पार्टनर्स आजची केस स्टडी सोडवून नुकतेच आपापल्या रुमवर परतलेले.याच्या डोक्यात मात्र अजूनही "अपॉरच्युनीटी कॉस्ट", आजच्या केस स्टडीचा विषय, याचेच विचार घोळत होते.
एक्सिक्युटीव्ह एम्.बी.ए. च्या पहिल्या सेमिस्टरच्या पुस्तकांच्या मधे कुठेतरी अॅश ट्रे सापडला.तुडूंब भरलेला.पर्यायच नव्हता. तो उठला आणि अॅश ट्रे रिकामा करुन आला.
गोल्ड फ्लेक शिलगावली.
"अपॉरच्युनीटी कॉस्ट", दोन पर्यायांपैकी एक निवडल्यावर, दुसरा पर्याय न निवडल्याने गमावलेला फायदा, ही निवडलेल्या पर्यायाची "अपॉरच्युनीटी कॉस्ट".
आजतोवर स्वीकारलेले आणि नाकारलेले पर्याय आणि त्यांच्या परिणामांच्या बेरजा-वजाबाक्या त्याच्या डोळयांसमोर येऊ लागल्या.
सहावी, सातवी, आणि आठवीत चित्रकलेत खूप बक्षिसे मिळवली.मी कोण होणार? तर चित्रकार, हेच डोक्यात.
पण डोके होते. बोर्डात नंबर. तो पण दोन्हिवेळेस. यू.डी.सी.टी. केमिकल इंजिनीअरींगला सहज प्रवेश. एफ.ई. चे ग्राफिक्स आणि एका वर्षीच्या कॉलेज मॅग्झिनचे कव्हर डिझाईन इथेच त्याच्या चित्रकलेच्या चित्तरकथेला पूर्णविराम मिळाला. एक पर्याय संपला.
कॅम्पसला पहिल्या दिवशी आय्.टी. कंपनी होती. हा विनासायास सिलेक्टेड. दुसर्या दिवशी प्रॉक्टर अॅन्ड गॅम्बल, प्रत्येक केमिकल इंजिनीअरची ड्रीम कंपनी. हातात ऑफर लेटररुपी पर्याय असताना प्रॉक्टर अॅन्ड गॅम्बलला अॅप्पीअर होण्याचा फारसा मूड असा नव्ह्ताच. एक पर्याय असा संपवला गेला.
पुढे मेनफ्रेममधे पोजेक्ट मिळाला. शिक्षण आणि काम यांचा अर्थाअर्थी संबंध कमीच पण "अर्थ" चांगले होते. बरेचदा रात्री १० ते सकाळी ७ अशी शिफ्ट. पहिली गोल्डफ्लेक अशीच एका रात्री प्रॉडक्शन सपॉर्टचे टेन्शन फुंकून कसे टाकायचे ते शिकवून गेली. कामात हा हुषार. दोन वर्षांनी यु.के. ला ऑनसाईट मिळाले.तिथे तीन वर्षे "बॅटींग" केली. क्लायंट साईटवर मॅकीन्झिचे बरेच टिप्-टॉप कन्स्लटंट्स दिसायचे. हा मनात तुलना करायचा.
पाच वर्षात सेव्हिंग झाले होते. लग्न-घरदार यात पडणे आता शक्य होते. किंवा ??? पर्याय संपले असे वाटत होते पण...एका वर्षाच्या एक्सिक्युटीव्ह एम्.बी.ए. ला अॅडमिशन घेतली. सेव्हिंग अकाऊंट निल झाले. पर्यायाने लग्न-घरदार हे आता पाच एक वर्षेतरी लांबणीवर पडले.
"चित्रकारच झालो असतो तर.. क्रिएटीव्ह लोकांसाठी खूप स्कोप आहेच की."
"प्रॉक्टर अॅन्ड गॅम्बल मधे गेलो असतो तर.. छान वर वर गेलो असतो एव्हाना."
"यु.के.त सेटल झालो असतो तर ..आधी प्रोजेक्ट मॅनेजर आणि मग अकाऊंट मॅनेजर झालोच असतो की."
"फॅमिलीमॅन झालो असतो तर बरोबरीच्या मित्रांच्या लग्नांचे इनव्हिटेशंस पाहून बोअर झालो नसतो."
"तसा धरसोड नाहीये मी. लाथ मारेन तिथे पाणी काढतो मी. पण प्रोब्लेम हा आहे की मी लाथा फार मारल्या. एकच सणसणीत लाथ मारली असती तर बरे झाले असते."
"सकॄतदर्शनी मी लाथ कुठे मारायची हे ठरवताना अजूनही चाचपडतोय. पण लौकीक अर्थाने..."
बीप्..बीप्..बीप..
मोबाईलचा साडे पाचचा अलार्म वाजला. ऊठून जरा योगा करावा म्हणून लावलेला अलार्म.
झोपायचा पत्ता नाही अजून. ऊठायाचा अलार्म काय कामाचा!
पुन्हा दोन पर्याय.. झोप की योगा?
"अशा पर्यायांची अपॉरच्युनीटी कॉस्ट काढणे सोप्पे असते!" डोक्यावर चादर घेताना तो हसत म्हणाला.
Sunday, November 29, 2009
Subscribe to:
Posts (Atom)