ऑफिस मधील अप्रेझलच्या मोसमात आपल्यासारखाच मार खाल्लेला दुष्काळग्रस्त मित्र लाभणे यापेक्षा दुसरे भाग्य नाही. संध्याकाळी घरी आल्यावर मी माझ्या अशाच एका मित्राला फोन लावला.
"हॅलो. काय रे, काय सुरु आहे?" मी.
"काही नाही रे. तू बोल." तो.
सिक्स्थ सेन्स म्हणा किंवा काहीही म्हणा पण अशावेळी दोघांनाही बरोबर माहित असते की आता कोणता विषय निघणार आहे ते.
"आज रेटिंग समजले आणि डिसकशनपण झाले." मी सांगून मोकळा झालो.
"मला 'गुड' दिलयं आणि डिसकशन उद्या होईल." त्याने आपली पाने टेबलावर टाकली.
"सेम हिअर. मला पण तेच. आऊटस्ट्यांडींग, एक्सलंट, गुड, आणि अॅव्हरेज या क्रमाने गेलो तर 'गुड' म्हणजे 'बॅड' आहे. उगाच आपलं मोराल टिकून राहावं म्हणून गोड गोड नावे देतात साले........." बायको घरी असल्यामुळे मी जरा तोंड आवरलं.
" तुझा बॉस काय म्हणाला डिसकशनमधे?"
"नेहमीचचं. टेक्निकली तू स्ट्राँग आहेस पण पर्सनल इफेक्टीव्हनेस आणि रिस्पॉन्सिव्हनेस यात इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे" मी माझी बिनपाण्याने कशी झाली ते सांगितलं.
"वाटलचं मला. हे बरायं, सॉफ्ट स्किल्सचा पॉईंट काढ्ला की आपल्याला जास्त बोलता येत नाही रे."
" बोलता येत नाही म्हणण्यापेक्षा धाडकन डिफेंडही करता येत नाही." मी जरा रिडिफाईन केले.
-----------------------------------------------------------------------------
"आता जरा तो फोन ठेव. पिल्लू उठलयं वाटतं. जरा बघ त्याच्याकडे. " बायकोने किचन मधून सांगितले.
आमचे तसेही बोलून झालेच होते. मी फोन ठेवला आणि आमचे तीन महिन्याचे बाळराजे ज्या खोलीत नुकतेच झोपेतून उठून खुसखूस आवाज करत क्रीबमधे पडले होते तिथे गेलो.
"त्याचा डायपर बदलायचाय. तेवढा नवा डायपर घे आणि बदल." बायको आतून वदली.
"हो."
मी डायपर्सचा खोका शोधू लागलो. कपाट उघडणे, ड्रॉवर्स आत बाहेर करणे, बेड जवळचे कॉफी टेबल उचकटणे आदिंचे आवाज एकून पाच एक मिनीटांनी शेवटी एकदाची बायकोच प्रकट झाली. काहीही न बोलता, क्रीबचा वरुन दुसरा कप्पा उघडून एक नवा डायपर तिने बाहेर काढला.
"तीन महिने झाले तरी अजून डायपर्स कुठे ठेवलेले असतात त्याचा पत्ता नाहीये तुझ्या बाबांना!"
कधी नव्हे ते वाटून गेले. बॉसचा सॉफ्ट स्किल्सचा पॉईंट खरचं बरोबर होता की काय?
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
haa haa saahi re Rajan..
shevatcha point avadlaa
Post a Comment